Wednesday, 24 June 2015

"ग्रामपिता पोपटराव पवार"



महाराष्ट्र हा समाजसुधारकांचा देश आहे. ग्रामविकासाची परंपरा येथे अखंडितपणे सुरु आहे. संत तुकडोजी महाराज , गाडगेबाबा, अण्णाहजारे  यांचे ग्रामविकासाचे विचार प्रमाण मानून कोणताही राजकीय वा सामाजिक  वारसा नसताना स्वकष्टाने व स्वकर्तुत्वाने पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत पोपटराव पवार  हे एक आदराचे स्थान बनले आहे.
पोपटराव ! नाव ऐकतानाच त्यातला भारदस्तपणा जाणवतो. त्यांच्या चेहऱ्यावरील भावच त्यांची कृषी व ग्रामविकासाप्रती असणारी तळमळ दाखवितात. सेवा या तत्वासाठी आपल्या  आयुष्याचा त्याग करताना केवळ जनसामान्यांचे भलेच करावयाचे नाही तर दुसऱ्यांना आपल्या असीम त्यागातून प्रेरणा व उर्जा देऊन मोठी चळवळ उभी करून  आधुनिक व चंगळवादी युगात एका नव्या आदर्शांची उभारणी करण्यासाठी न थकता अहोरात्र कष्ट करण्याची  व झटण्याची ताकद असणारा हा माणुस! म्हणूनच आज ग्रामविकासाची पताका खांद्यावर घेऊन तरुण या प्रवाहात सामील होत आहेत.
गावात ज्या सहजतेने व सुलभतेने व संवेदनशील मनाने हा माणुस लोकांची मने जोडण्याची कामे करतो व त्याच  उर्जेने व वेगाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ग्रामविकासाचा प्रदीर्घ  अनुभव व प्रचंड काम यांच्या जोरावर ग्रामविकासाच्या विचाराचे वैश्विकरण करून सर्वांनाच थक्क करून सोडतो.
आपल्या कार्याने लोकमान्यता मिळालेला माणुस आजदेखील स्वतःला गावातील ग्रामविकासाचा ध्यास असणारा एक कार्यकर्ता समजतो यातच त्यांचे मोठेपण दडले आहे. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेण्याची प्रचंड क्षमता व त्याच क्षमतेने आपणाकडे असणारे माहितीचे व ज्ञानाचे भांडार जगाच्या कल्याणाकरिता खुले करून देण्याची परोपकाराची भावना ही वैश्विक विचारांची प्रचीती देते.
आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजाच्या भल्यासाठी खर्च करण्याचा संकल्प करणारी ही व्यक्ती आपले कुटुंब, आपले गाव या सर्व सीमा ओलांडून सर्वच गावांचा   ‘पिता’ बनते. अशा या ‘ग्राम पित्याला’ शत कोटी प्रणाम.

No comments:

Post a Comment